तोरण्याच्या मशाली – एक स्वप्न

     ६-७ ची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा  ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली. अंधार पडलेला म्हणायला हरकत नव्हती. हे आणले का ते आणले का गप्पा चाललेल्या तोवर पावसाने हजेरी लावली. माझी गडबड झाली कारण मी काहीच तयारीत नव्हतो. बाकीचे भिजत उभे आणि मी एका घराच्या मागे छपराच्या आडोश्याला गेलो. प्लास्टीकच्या पिशवीत कॅमेरा वगैरे भरु लागलो. सहाजीकच “असा कसा आला रे तु?”,”packing करुन का नाही आला?”  वगैरे प्रश्नांचा भडीमार पलिकडून होत होता. एेकतंय कोण? माझ्या डोक्यात नुसता तोरणा !!
आवराआवर होत होत गेला की पाउस! नेहमीचे आहे तयारी नसली की येणार तयारी झाली की गायब!  बॅग पाठीवर मारुन उठलो आणि गडाच्या वाटेवर डोंगरात काहीतरी चमकल्यासारखे दिसले. डोळे बारीक करुन पाहीले…. होय होय मशालीच त्या! तोरण्याच्या मशाली!! म्हणजे जे एेकलेले ते खरे की काय?

मागे एका मुक्कामात चर्चेत विषय निघालेला. तोरण्याच्या वाटेवर मशाली दिसतात म्हणे.. मग ते आत्मे, भुते का कोण मुद्दाम करतय? बराय .. असं सगळ्या गडकोटांना आवया उठवा भुताखेतांच्या. गडकोटांचे वार्धक्व जरा तरी जपुन राहील त्या निमित्ताने!!

अंधार, समोर नावाला साजेसा प्रचंडगड आणि एेकलेल्या मशाली… टरकलेली पण मजा पण आली. निट पाहीले तर प्रकाशात झेंड्याची सावली कळत होती. होय तो भगवाच असणार! नजर न हलवता जोरात ओरडलो “किरण अरे किरण, लवकर ये, तोरण्याच्या मशाली दिसतायत, पळत य. भुते नाहीत मावळे आहेत आपलेे”. किरण पळतच आला “कुठे कुठे?” ओरडत. पण त्याच्या धावण्यासोबत मशाली विझलेल्या! बोललो च्यायला आता ह्याला वाटणार मी चेष्टा करत होतो. मग हा ही विचार आला की मला भास सुध्दा झाला असावा. काहीही असो गडाच्या वाटेवरची ती मशालींची रांग किरणने हुकवली.

Fort Torna
थोडे क्षण शांततेत गेले. दोघेही नजर न हलवता पहात होतो पण अंधाराशिवाय काहीच हालचाल नाही. आता माझा संयम सुटला मी माघारी फिरलो. तोवर किरण ओरडला “अरे दिसल्या दिसल्या”. मी पळत माघारी फिरलो. हो दिसत होत्या मशाली आणि आता अधिक पायथ्याच्या जवळ आलेल्या. झेंडे नीट दिसयाला लागलेले. जशजश्या मशाली जवळ येत होत्या उत्कंठा वाढत होती… माझा अंदाज होता की जवळ येतील गावाच्या आणि हवेत सारं काही विरुन जाईल एकदम, सिनेमात असतं तसे.

पण टापांचा आवाज, मशालींचा उजेड सुस्पष्ट होत गेला. आणि हा हा म्हणता ती गस्त गावात आली.
अहाहा! काय पहावे म्हणता. मावळे! भगवे घेतलेले मावळे! हातात भाले, मशाली पेलत अश्वारुध मराठे! अक्षरश: शिवशाही अवतरलेली! मी मंतरल्यासारखा पहातच राहीलो. तेवढ्यात १०-१२ गावकरी आरत्या घेउन आले. “शिवभक्तीचा विजय असो” असे काहीतरी ओरडले. मग मावळ्यांच्या आरत्या करुन पाया पडू लागले.

माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. कोण हे मावळे? का हे पुण्यात्मे? हे रोज असा गड उतरतात का काही विशिष्ट दिवशी? हे कधीपासुन करतायत? गावक-यांना काय माहीती आहे का? असे अनेक प्रश्न आणि ते गावक-यांना विचारायचे मी ठरवले. तेवढ्यात किरणने माझी तंद्री मोडली ” चल रे आपण पण पाया पडुया” आम्ही स्वारांकडे निघालो आणि दुर्देव तेव्हाच माझे डोळे उघडले. उठलो, प्रसन्न मनाने आणि रागाने. अजुन थोड्या वेळाने झोप मोडली असती तर.. च्यायला….
असो. फार छान वाटले! सकाळ भारावलेली गेली… शिवशाहीच्या दर्शनाने भारावलेली सकाळ !!! पुढे दिवस कसा गेला हे सांगणे न लगे !!!!!!

तळटीप : हा लेख पुर्णत: स्वप्नात घडलेली गोष्ट आहे त्याला कोणत्याही सत्यघटनेचा आधार नाही. या लेखातुन मी गडकोटांभोवती होणा-या कोणत्याही मानवी/अमानवी कथा/दंतकथांचे समर्थन करीत नाही.

© श्रीकांत लव्हटे
shrikant.lavhate@gadkot.in

Shrikant Lavhate

Author is an amateur trekker, photographer and poet. He started his trekking back in 2009 and since then exploring the history of Marathas in ruins of Forts and all available chronicles.

6 thoughts to “तोरण्याच्या मशाली – एक स्वप्न”

  1. Popat kelas maza. …till the end I was feeling its real….n shvti taltip
    ……but really very very nice. ..

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.