Maratha History Calendar

शिवकालातील दिनविशेष | Maratha History Calendar

This Maratha history Calendar is prepared by Shrikant Lavhate with information given by ॐकार in Orkut thread  and by Rohan Chaudhari on this blog. Other entries are added with their author and source link information in footer of event.

Please bring into notice any corrections if needed with supporting references. Required corrections will be made into entries.

Bookmark and share this page. Get acquainted with daily history happenings.

April 24, 2019
 • २४ एप्रिल १८१८

  दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २४ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश. २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

 • २४ एप्रिल १६७४

  शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाबाई साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.

April 29, 2019
 • २९ एप्रिल १६६१

  शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.

April 30, 2019
 • ३० एप्रिल १६५७

  शिवाजी महाराजांनी जुन्नर हे मोगली ठाणे लुटले.

  काही दिवसांपूर्वीच शिवाजी राजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला "प्रेमाचा" खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी "मोगलांचे अधिकारी" या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७.

  जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवाजी नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.

May 1, 2019
 • १ मे १८१८

  दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

 • १ मे १६६५

  पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.

May 3, 2019
 • ३ मे १८१८

  दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

 • 3 मे 1636

  बल्खच्या सुलतानाकडे नोकरीला असलेला वकास हाजी हा शहाजहांकडे आला. शहाजहानने त्याला एक हजारी जात / आठशे स्वार अशी मनसब दिली.

  संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती (गजानन मेहंदळे)
  संदर्भग्रंथ : बादशाहनामा खंड 1, भाग 2, पृष्ठ 166

May 4, 2019
 • ४ मे १७३९

  वसई विजयोत्सव दिन.. वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 5, 2019
 • ५ मे १६५८

  विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड शिवाजी राजांनी जिंकली.

 • ५ मे १६६३

  गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.

  १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 6, 2019
 • ६ मे १६७५

  छत्रपति शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला

 • ६ मे १६५६

  रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 9, 2019
 • ९ मे १६७४

  शिवाजी महाराज चिपळूणहून रायगडावर परतले.

 • ९ मे १६६०

  शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 10, 2019
 • १० मे १८१८

  दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात प्रचंड तोफांचा मारा करून मेजर प्रोथेरने रायगड किल्ला उध्वस्त केला. ४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 11, 2019
 • ११ मे १७३९

  मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

May 12, 2019
 • १२ मे १६६६

  शिवाजी महाराजांची व औरंगजेबाची आग्र्यास दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'.

May 13, 2019
 • १३ मे १६७०

  मराठ्यांनी मळवली जवळील लोहगड व विसापूर हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

 • १३ मे १८१८

  दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

 • १३ मे १६७७

  शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली.

May 14, 2019
 • संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. शंभु जयंती(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, गुरूवार) [१४ मे १६५७]

  राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे 'केदारेश्वर' तर दुसर्‍या टेकडीचे नाव आहे 'राजगादी'.

  'राजगादी' हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता.

  या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.

May 16, 2019
 • १६ मे १६४०

  शिवाजी राजांच्या फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी पुणे येथे विवाह.

 • १६ मे १६४९ (ज्येष्ठ पौर्णिमा)

  शिवाजी राजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी फर्रादखानाचा पराभव केला. शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शाहजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सशर्त सुटका केली.
  -------------
  विजापुरच्या आदिलशहा कडून शहाजीराजांची सुटका झाली. शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

 • १६ मे १६६५

  दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,

  "अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !"

  पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.

  आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.

May 18, 2019
 • १८ मे १६७५

  मराठ्यांनी कारवार जिंकले.

May 19, 2019
 • १९ मे १६७४

  शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास निघाले. तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले. तेथे ते ३ दिवस राहिले.

May 20, 2019
 • २० मे १६६५

  राजगडाहून शिवाजी महाराजांचे वकिल रघुनाथपंत "पंडितराव" मिर्झा राजा जयसिंह यांच्याकडे (पुरंदर) तहासाठी रवाना केले.

May 21, 2019
 • २१ मे १६७४

  राज्याभिषेकापूर्वी सोडलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते.

May 23, 2019
 • २३ मे १७३७

  पोर्तुगीझांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुनश्च बांधून घेतला.
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

5 thoughts to “Maratha History Calendar”

  1. मिळेल ना. फेसबुकवर मोडी लिपी प्रसार समितीचा ग्रुप आहे तिथे चौकशी केल्यास आपण राहत त्या विभागातही तज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळेल

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.