Maratha History Calendar

शिवकालातील दिनविशेष | Maratha History Calendar

This Maratha history Calendar is prepared by Shrikant Lavhate with information given by ॐकार in Orkut thread  and by Rohan Chaudhari on this blog. Other entries are added with their author and source link information in footer of event.

Please bring into notice any corrections if needed with supporting references. Required corrections will be made into entries.

Bookmark and share this page. Get acquainted with daily history happenings.

December 31, 2017
 • ३१ डिसेंबर १८०२

  पेशवा बाजीराव दुसरा आणि इंग्रज यांच्यात तह. या तहानुसार मराठ्यांचा बराचसा भूभाग इंग्रजांच्या अंमलाखाली गेला
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

January 2, 2018
 • २ जानेवारी १६६१ : त्र्यंबक पिंगळे मुजुमदारी

  इ.स. २ जानेवारी १६६१ या दिवशी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली.

  मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे.

  या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा - खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच 'पेशवे' झाले (दि.०३/०४/१६६२).

  मोरोपंत पेशवे पंतप्रधान - ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.

January 5, 2018
 • ५ जानेवारी १६६४ : सुरतेवरील पहिली स्वारी

  सुरत

  शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."

  सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.

 • ५ जानेवारी १६७१ : साल्हेर

  शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला.

  साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.

January 6, 2018
 • ६ जानेवारी १६६४, बुधवार - सुरतेवरील स्वारी

  सुरत लुटीचा पहिला दिवस.

  सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान "बहाद्दर" शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्‍यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.

 • ६ जानेवारी १६६५ - सुवर्णतुला..

  श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते.

  या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला. स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्‍या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !

  उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्‍या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
  जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.

  ही आमची संस्कृती आहे. "मदर्स डे" ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे. अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा !

  सोनोपंतांचे नाव आज खर्‍या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.

 • ६ जानेवारी १६७३

  अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला.

  शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.

January 7, 2018
 • ७ जानेवारी १६६४, गुरूवार (सूरतेवरील प्रथम स्वारी)

  सुरतेच्या लुटीचा दूसरा दिवस. सकाळी दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने वकिलामार्फत शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला.

  ही घटना पाहणार्‍या स्मीथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिअट या व्यक्तिने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा.....

  "गुरूवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरूण मुसलमानाला शिवाजी बोलला की,

  " या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय ?"

  त्यावर, " आम्ही पण बायका नाही ; हे घे"

  असे उलट बोलून तो तरूण शिवाजीच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसर्‍याने छाटला असताहि तो त्या भरात शिवाजीच्या अंगावर आदळून दोघेही कोलमडून पडले व शिवाजीच्या अंगावर दिसणार्‍या त्या खुनी मुसलमानाच्या रक्तामुळे शिवाजी मेला अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्यात शिवाजीने आपल्यास सोडवून घेतले व दूसर्‍याने त्या खून्याचे डोकेही फोडले. तेव्हा शिवाजीने तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणी मर्जीप्रमाणे हात, पाय, डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला,

  " त्यापेक्षा माझे डोकेच उडवा !"

  शिवाजीने ते मान्य करून त्याची टोपिही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण शिवाजीला काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकाएकी कत्तल थांबवली व स्मिथ वाचला. तोपर्यंत ४ डोकी व २४ हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला."

  कसा भयंकर प्रसंग आहे हा ! गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या "परवानगीची" वाट न पाहता त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे ,पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भूरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपूष्टात आणावे लागते.

January 8, 2018
 • ८ जानेवारी १६५८

  कल्याणहून शिवाजी महाराज जातीने माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी महाराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड , शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

 • ८ जानेवारी १६६४, शुक्रवार (सुरतेवरील पहिली स्वारी)

  लूटीचा तिसरा दिवस.

  इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती 'ट्रॉय" शहरासारखी झाली होती. प्रचंड आग !

  गुरूवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसा धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते. शुक्रवारीहि आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लूटीला तर खंड नव्हता. लूटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळ जवळ संपत आले; तरीहि उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहानमोठी घरे पेटत होती.

January 10, 2018
 • १० जानेवारी १६६४, रविवार (सुरतेवरील प्रथम स्वारी)

  शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात. ह्या लुटीमधून उभे राहणार होते दुर्गम असे जलदुर्ग आणि अनेक इतर किल्ल्यांची दुरुस्ती होणार होती.

  धन्य ते शिवछत्रपति महाराज... "ज्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."
  Author : Rohan Chaudhari | Source : Link

January 12, 2018
 • १२ जानेवारी १५९८ -- राजमाता जिजाऊ यांची जयंती.

  लखुजीराव जाधव आणि आई महालसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाउंचे 'राजा शहाजी भोसले' यांच्याशी लग्न झाले.वडिल निजामशाही मध्ये तर नवरा आदिलशाही मध्ये चाकरी करत असताना मात्र मासाहेबांनी स्वतंत्र स्वराज्याची आस धरली होती. शहाजी राजांच्या साथीने ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी मराठा साम्राज्याचे 'छत्रपति शिवराय' आणि 'छत्रपति शंभूराजे' असे २ छत्रपति घडवले.

January 14, 2018
 • १४ जानेवारी १६५८

  कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले.काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती - किल्ले पुरंदर.

 • १४ जानेवारी १७६१ - पानिपतचा भयंकर संग्राम ... !

  गोष्ट आहे, बुधवार, १४ जानेवारी १७६१ च्या क्रूर दिवसाची. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,
  " कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
  तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"
  घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. "हर हर महादेव" आणि "अल्ला हो आकबर" चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली.
  या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर - अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्‍यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.
  पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहित...
  Author : Omkar | Source : Link

5 thoughts to “Maratha History Calendar”

  1. मिळेल ना. फेसबुकवर मोडी लिपी प्रसार समितीचा ग्रुप आहे तिथे चौकशी केल्यास आपण राहत त्या विभागातही तज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळेल

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply