दुर्ग कोर्लई

korlai fort


कोरलईचा किल्ला म्हणजे तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला जमीन!! हा किल्ला एखाद्या होडीसारखा पसरलेला आहे. त्याचे एक टोक सरळ समुद्रात घुसलेले तर दुसरे कोरलई गावात. जणु काही कोरलई किना-याला लागलेली दगडी महाकाय नौका!! किरण शेलारांनी दिलेल्या माहितीनुसार हा किल्ला ८-१० वर्षांपूर्वी जनतेसाठी खुला नव्हता. खाली असणा-या दिपगृहामुळे तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होता. सीमा शुल्क (custom) खात्याअंतर्गत होता. आता मात्र दिपगृहातुन वर किल्ल्याला जायला दगडी पाय-या आहेत. या दिपगृहापर्यंत पोहचायला कोर्लई गावातुन/बंदरातून गाडीरस्ता आहे. जेमतेम एक गाडी जाईल इतका साधारण ३-४ किमीचा रस्ता खालुन किल्ल्याला अर्धा वळसा घालतो. रस्त्याच्या एका बाजुला किल्ल्याचा डोंगर अाणि दुस-या बाजुला निळाशार समुद्र!!! एकदम सुरेख ड्राईव आपल्याला दिपगृहाच्या दारात नेते.

दिपगृहात प्रवेश केल्यावर समोरच ४-५ तोफा थोड्या थोड्या अंतरावर ठेवल्या आहेत. त्या पुर्ण भडक ना केशरी ना लाल ना भगवा अशा कुठल्यातरी बटबटीत रंगात रंगवुन ठेवल्या आहेत. असा इतिहासाचा ‘गौरव’ पाहुन फोटो काढायची इच्छाही मेली. या दिपगृहाच्या दर्शनी भागाच्या बरोबर मागे किल्ल्याला जाणा-या दगडी पाय-या आहेत. या पाय-यांनी वर चढत मागे वळून छोट्या होणा-या दिपगृहाचे आणि समुद्रचे फोटो काढत आपण १० मिनिटांतच किल्ल्याच्या दरवाज्यात पोहोचतो. या दरवाज्यातुन प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला किल्ल्याचा एक चर्तुथांश तर उजव्या बाजुला किल्ल्याचा तीन चर्तुथांश भाग आहे. असा किल्ला आडवा पसरलेला आहे.

आधी डाव्या बाजूला जाउन किल्ल्याच्या छोटा भाग पाहुन घ्यावा. डाव्या बाजूला एकामागोमाग एक २ दरवाजे आहेत. दरवाज्याच्या दगडी कमानी आजही सुस्थितीत आहेत. बाकी दरवाज्याच्या भिंती संवर्धनाच्या नावाखाली सिंमेंटने मढवलेत. २ दरवाज्यांच्या मध्ये सैनिकांना जागा आणि जंग्या आहेत. दुस-या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला ‘S. FRANSIS XAVIER’ ही अक्षरे कोरलेला दगड उजव्या बाजुच्या भिंतीत आहे. या दुस-या दरवाज्यापुढे माची आहे ती पुढे तोफेच्या बुरुजापर्यंत जाते. माची दोन्ही बाजुंनी भिंत बांधून संरक्षित केली आहे.

आता मागे फिरुन आपण दिपगृह-रस्ताच्या उजव्या बाजुला चालायचे. एक तुटलेल्या व सिमेंटने ‘संवर्धित’ केलेल्या भिंतीतला दरवाजा लागतो. या भिंतीवर मोठ्या झाडा-मुळांनी आपले राज्य विस्तारले आहे. दरवाज्याच्या मागेच उजव्या बाजुस बुरुज आणि एक तोफ आहे. खरेतर त्या बुरुजात ३ तोफा ठेवायची योजना आहे पण सध्या एकच तोफ आपले अस्तित्व टिकवून आहे. याखेरीज या गडाच्या भागात काही नाही.

पुढच्या भागाच प्रवेशण्यासाठी जो दरवाजा आहे तो साधारण ८-९ फुटाचा लांब बोगद्यासारखा आहे.  ८-९ फुटाची जाड भिंत आणि त्यात तो दरवाजा. तिथुन पुढचा दरवाजा मात्र २ बुरुजांमध्ये संरक्षित आहे. बुरुजांवर ३ तोफा आहेत. या गडाच्या भागात शंकराचे मंदीर, भूमिगत पाण्याचे टाके आणि एक तोफांनी सज्ज बुरुज आहे. या बुरुजाला लागुनच भिंतीत दरवाजा आहे जो आपल्याला पुढच्या चर्चवाल्या भागात नेतो. या दरवाज्याच्या वर (चर्चकडील भिंतीत) पोर्तुगीज (?) भाषेतील राजचिन्हासहीत मोठा शिलालेख बसविला आहे. सोबत ‘SPEDRO’ अशी अक्षरे असलेला दगडही भिंतीत आहे. या दरवाज्याच्या डाव्या बाजुला खाली उतरलायला मोठा जिना व जिनाअंती खाली दरवाजा आहे. येथून कोर्लई गावात उतरता येते.

शिलालेख असलेल्या दरवाच्यासमोर प्रशस्त मोठे चर्च आहे. हा दरवाजा आणि चर्च दरम्यान अजुन एक तितकाच मोठा राजचिन्हांकित शिलालेख तुटलेल्या अवस्थेत भिंतीला उभा करुन ठेवला आहे. चर्चच्या मागे साध्या दगडी चौकटीतला दरवाजा आहे. त्यावर पृथ्वीगोल सारखे मोठे चिन्ह असलेला शिलालेख आहे. त्या दरवाज्यामागे बुरुज आहे.  दरवाज्यातुन बुरुजावर रस्ता आहे.  बस इथे किल्ला संपतो. ही बाजु कोर्लई गावाकडची म्हणजे जमिनीकडची. इथुन मागे फिरुन पुन्हा दिपगृहाच्या रस्ताकडे जाताना गडाच्या दोन्ही बाजूचा निळाशार समुद्र डोळ्यात साठवून घ्यावा !!!


किल्ल्याचा ईतिहास :

हा किल्ला १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. पण त्याचे मालकी हक्क अहमदनगर सल्तनतकडे होते. अहमदनगर सत्ताक्लेशादरम्यान संधीचा फायदा घेत किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले पण त्यावर त्वरीत कारवाई झाली. पोर्तुगीज काही ताबा मिळवू शकले नाहीत. १५९५ मध्ये पुन्हा पोर्तुगीजांनी किल्ल्यावर हल्लाबोल केला. यावेळी मात्र सल्तनतच्या सैनिकांना किल्ला राखण्यात यश आले नाही. पोर्तुगीजांनी ताबा मिळाला पण मनुष्यबळ पुुरेसे नसल्याने त्याना किल्ला संरक्षित करण अवघड होते. म्हणून त्यांनी किल्ला मोडला (पुर्णपणे नाही. महत्वाच्या वास्तू राखल्या). नंतर १६८७ मधल्या संभाजीराजांच्या असफल प्रयत्नानंतर,  १७३९ ला किल्ला चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांकडे आला. तो १८१८ पर्यंत मराठ्यांकडेच होता. १८१८ मध्ये कर्नल प्रार्थरने दक्षिणेत काढलेल्या दुर्ग-तोडा मोहिमेत या किल्याने मान टाकली आणि तो दुर्गभंजक ब्रिटीशांकडे गेला.


भौगोलिक स्थान:

दुर्गप्रकार                     : जलदुर्ग किंवा मिश्रदुर्ग

अक्षांश-रेखांश               :18°53’63.46″N  72°90’81.19″E

जवळील शहर               : रेवदंडा (६ कि.मी.)

जवळचे प्रवासमार्ग        : अलीबाग-रेवदंडा मार्ग.

आजुबाजुचे किल्ले         : रेवदंडा किल्ला

भोवतालचा प्रदेश          : किल्ल्याच्या पायथ्यालाच कोर्लई दिपगृह आहे. जवळच रेवदंडा किल्ला आहे. त्याचीच तटबंदी पाडुन त्यातुन लीबाग-रेवदंडा मार्ग काढलेला आहे. आजुबाजूच्या गर्दीत जरी तटबंदीच्या भिंती हरवल्या असल्या तरी चाणाक्ष नजरेतुन त्यांचे अस्तित्व सुटत नाही. किल्ल्याच्या पायथ्याला कोर्लई सागरकिनारा आहे पण मासेमारी व्यवसायाशी निगडीत होड्यांसहीत असंख्य गोष्टींनी तो व्यापलेला अाहे.


गिर्यारोहण:

 

दुर्गमता                        : सोपा

चढाईसाठी वेळ              : १० मिनीटे (कोर्लई दिपगृहापासुन)

उतरायचा वेळ               : १० मिनीटे

पाण्याची उपलब्धता       : गडावरील एका टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे अशी पाटी पुरातत्व खात्याने लावली आहे. पण पाणी सोबत नेणे उत्तम.

जेवण्याची सोय             : गडावर वा वाटेवर खाण्याची सोय / उपहारगृहे नाहीत. त्यामुळे खाण्याचे जिन्नस सोबत न्यावेत.

माणसांची वर्दळ             : तुरळक लोकच असतात. तसा दुर्लक्षीत किल्ला. त्यामुळे २-३ जण जात असल्यास सोयीस्कर.

अनुकूल महीने             : ओसरता पावसाळा व हिवाळा भ्रमंतीस उत्तम. गड छोटा असल्याने उन्हाळ्यातही गडावर जाताना विशेष दम लागत नाही.

रस्ता                            :मुंबईवरुन NH-66 वरुन पेण मार्गे निघायचे. पुढे महामार्ग सोडुन अलीबाग-पेण रोडला वळायचे. तेथुन अलीबाग-रेवदंडा मार्गे कोर्लई दिपगृह गाठावा. दिपस्तंभाच्या मागुनच वर जायला पाय-या आहेत.

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply