Forts

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही | महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकारणे || 

“राज्याचे सार ते दुर्ग” हे जाणणा-या आणि दुर्गस्थापत्यशास्त्राला नव्या उंचीवर नेणा-या छत्रपती शिवरायांच्या चरणी हे शब्दबिल्व अर्पण…

 

छत्रपती शिवरायांनी मुुठभर मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्याचे रोप लावले आणि आपल्या पुर्ण जीवनकाळात त्याचा वटवृक्ष केला. या प्रवासात ब-याच तरवारी चालल्या, पट्टे फिरले, मावळ्यांनी गनिमी काव्याने शत्रुचे प्रदेशच्या प्रदेश जिेकले. या गनिमी काव्याला आधार होता महाराष्ट्राच्या भुगोलाचा !! सह्याद्रीचा !! भुगोलाचा उपयोग करुन ईतिहास घडवणारा मराठ्यांचा राजा … जाणता राजा .. छत्रपती शिवराय !! शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगर-शिखरांना तट-बुरुजांनी नटवले. शिवरायांच्या आधी दुर्ग नव्हते असे नाही पण ज्या कल्पकतेने शिवरायांनी जुन्या किल्ल्यांमध्ये बदल केले, नवीन किल्ले बांधले ती कल्पकता, ते दुर्गस्थापत्यशास्त्र आधी क्वचितच पहायला मिळते. स्वराज्यातला एक एक दुर्ग एक एक मावळा होता. त्या दृष्टीतुन असे एकेक दुर्गम, भांडणारे दुर्ग घडविले गेले. या दुर्गांची किर्ती अपरंपार आहे. हुकुमतपन्हा रामचंद्र अमात्य आज्ञापत्रात शिवरायांच्या स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात महत्वाची कामगिरी बजावणा-या गडकोटांबद्दल लिहीतात —

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन उव्दस होतो. देश उव्दस झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करुन घेतला आणि आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थस्वरुप थोरले कैलासवासी स्वामी (शिवराय)यांनी गडांवरुनच निर्माण केले. जो जो देश स्वशासन न होय त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेच जलदुर्ग बांधिले; त्यावरुन आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगर सारखी महासंस्थाने आक्रमिली, संपूर्ण तीस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्याशी अति श्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होते? परंतू राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्ट तरी राज्य राहीले. पुढे पूर्ववत् करावयास अवकाश जाहला. याउपरही ज्यापेक्षा राज्य संरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गड-किल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची यथायोग्य मजबुदी करावी. नूतन देश साधणे त्या देशात जी स्थळे असतील ती महत्प्रयत्ने हस्तवश करावी. ज्या देशात गडकोट नसतील त्या देशात आपल्या राज्याचे सरदेपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळे बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रयी सेना ठेवून पुढील देश स्वशासन करावा. असे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटाचा आश्रय नसता फौजेच्याने परमुलखी टिकाव धरुन राहवत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेच नाही. इतक्याचे कारण ते गडकोटविरहित जे राज्य त्या राज्याची स्थिती म्हणजे अभ्रपटल न्याय आहे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यास गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता आहे त्याचे संरक्षण करणे म नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा, कोणाचा विश्वास मानू नये.

अशा या सह्याद्रीच्या दुर्गवैभवाबद्दल थोडेसे लिहण्याचा माझा प्रयत्न………..


 पनवेल कडुन मुबंईकडे येताना गोवा महामार्गावर एक सुळका येणा-या-जाणा-यावर डोळे काढुन उभा आहे… हो तोच कर्नाळ्याचा सुळका !! नवी मुंबईकरांना अगदी जवळचा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेक साठी मस्त. वाट अभयारण्यातल्या जंगलातुन असल्याने भर उन्हातही ट्रेक करता येतो.


पाली…पालीचा बल्लाळेश्वर गणपती…अष्टविनायकाचे एक रुप… पालीने या हि-यासवे अजुन एक हिरा जपुन ठेवला आहे… पगडीचा किल्ला!! म्हणजेच सरसगड…. लांबुन हा किल्ला पुणेरी पगडीसारखा दिसतो म्हणुन याला “पगडीचा किल्ला” असेही म्हणतात.


Korlai bannerकोरलईचा किल्ला म्हणजे तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला जमीन!! हा किल्ला एखाद्या होडीसारखा पसरलेला आहे. त्याचे एक टोक सरळ समुद्रात घुसलेले तर दुसरे कोरलई गावात. जणु काही कोरलई किना-याला लागलेली दगडी महाकाय नौका!!