English factories

East India Company : History

पौर्वात्य देशात व्यापार करण्यासाठी उदयास आलेल्या या कंपनीचे ‘East India Company’ असे नामकरण झाले नव्हते. साधारणपणे तिला ‘Company of merchants of London treading in East Indies’ असे ओळखले जाई. अगदी शिवकाळात तिचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी असा एकाच पत्रात (३० मार्च १६३६ इंग्लंडच्या राज्याचे पत्र) आहे. कालांतराने मोठे नाव वगळून हे छोटे नाव प्रचलित झाले असावे असे माझे मत आहे.

कंपनीचा उदय आणि सनदा :

 • २२ सप्टेंबर १५९९ ला लंडन मध्ये झालेल्या सभेत ३०१३३ पौंडाचे लक्ष पुढे ठेवून १०१ नोंदणीकृत सभासदांसह या कंपनीचा उदय झाला. लंडनच्या लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत तिला मान्यता मिळाली.
 • ३१ डिसेंबर १६०० रोजी इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने या कंपनीला १५ वर्षे पौर्वात्य देशात व्यापाराचा एकाधिकार दिला.  याअंतर्गत केप ऑफ गुड होप पासून ते पूर्वेला स्टेट ऑफ मेगॅलन पर्यंत कंपनीशिवाय कोणीही इंग्रज व्यापार करू शकत नव्हता.
 • १६०९ मध्ये इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याने ह्या एकाधिकाराची वेळ मर्यादा बेमुदत केली आणि सोबत अट जोडली कि जर या व्यापाराचा राज्याला फायदा झाला नाही तर ३ वर्षाची मुदत देऊन हा एकाधिकार रद्द करण्यात येईल.
 • पुढे १६३५ मध्ये या बेमुदत सनदेचा भंग इंग्लंडचा राजा चार्ल्स याने केला. त्याने कोर्टीन्स असोसिएशनला पौर्वात्य देशात व्यापार करण्याचा परवाना दिला. यामुळे कंपनीचा एकाधिकार संपुष्टात आला.
  कंपनीने एकाधिकार परत मिळवा म्हणून प्रयत्न सुरु केले आणि त्यांना एकाधिकार पुन्हा मिळाला १६५७ मध्ये! इंग्लंडचा हुकूमशहा क्रोमवेल यांच्याकडून. दरम्यान ईस्ट इंडिया कंपनी आणि कोर्टीन्स यांचे मतभेद, विलीनीकरण इ. घटनांमुळे कंपनीचा नफा घसरला.
 • १६६१ मध्ये चालू सनदेत सुधार करून इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला  पौर्वात्य देशात किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे, युद्ध अथवा तह करणे हे हक्क सुद्धा दिले.

  English factories
  English factories

कंपनीची कारभार व्यवस्था :

कंपनीचा व्यापार हा उपक्रमावर चालत असे. एका उपक्रमात जहाजे माल घेऊन पौर्वात्य देशी जात, तिकडे माल विकत, तिकडील माल विकत घेत, तो माल मायदेशी आणून विकत. सभासदांना प्रत्येक उपक्रमात पैसे गुंतवण्याची सक्ती नसे. जे सभासद उपक्रमात पैसे गुंतवत त्यांना मिळालेला नफा वाटला जाई. प्रत्येक सभासदाला एक किंवा अनेक उपक्रमात लुईस गुंतवण्याची मुभा असे.
उपक्रम सुरु झाला कि त्याची एक उपसमिती नेमली जाई. ती समिती भांडवल गोळा करणे, जहाजे बांधणे व भाडे तत्वावर घेणे, जहाजावर माल व माणसे नेमणे , जहाजे परत आल्यावर माल उतरवणे आणि विकणे, नफा वाटप हि कामे करी.
या उपसमितीच्या वर संचालक मंडळ होते. उपक्रमांमध्ये दुवा साधण्याचे काम हे संचालक मंडळ करत असे. हि पद्धत १६१२ पर्यंत सुरु होती. पण उपक्रम वाढत गेले तसे या पद्धतीतील त्रुटी जाणवू लागल्या. त्यामुळे कंपनीने ‘विसर्जनीय सामाईक भांडवल’ पद्धती सुरु केली.
विकायला नेलेला आणि मायदेशी परत आणलेला माल विकण्यास लागणार वेळ, हवामानावर अवलंबून असणारा जहाज प्रवास यामुळे एक उपक्रम संपण्याआधी दुसरा सुरु होई. असे एकवेळी अनेक उपक्रम सुरु असल्याने भांडवल, नफा हिशोब जिकिरीचे झाले. म्हणून एक उपक्रमाला गुंतवलेले भांडवल त्या एका उपक्रमकरिता रुजू न करता ते अमुक इतक्या वर्षांसाठी गुंतवून घेतले जाई. त्यामुळे पैसा विविध उपक्रमात फिरवता येई. हि ती विसर्जनीय सामाईक भांडवल पद्धत!
हि पद्धत १६६० पर्यंत सुरळीत चालली. त्यानंतर तिचेच सुधारित रूप कायमचे ‘सामाईक भांडवल पद्धत’. या पद्धतीअंतर्गत सभासदाने गुंतवलेले भांडवल संचालक मंडळाच्या हातात कायमचे राही. उपक्रमाच्या नफ्यानुसार गुंतवणूक दाराला लाभांश दिला जाई. भांडवल आणि नफा पूर्ण द्यावा लागत नसल्याने आता संचालक मंडळाच्या हाती बराच पैसा राहू लागला आणि त्याच्या बळावर कंपनी अधिक दूरदृष्टीने निर्णय घेऊ शकत होती. उर्वरित पैसा पुन्हा नवीन उपक्रमात गुंतवता येई म्हणजे नवीन उपक्रमासाठी भांडवल आणि सभासदांची वाट पहावी लागत नसे. हे आताच्या शेअर पद्धतीनुसार काहीसे होते.

आकडेवारी :

 • कंपनीच्या सुरवातीला १०१ सभासदांनी ३०,१३३ पौंडाचे भांडवल उभे केले होते.
 • पण पहिला जहाजाचा काफिला पौर्वात्य रवाना करण्यासाठी ६८,३७३ पौंडाचे भांडवल उभे करावे लागले.
 • कंपनीच्या पहिल्या ९ उपक्रमांमध्ये मिळून ४,६६,१७९ पौंड भांडवल गुंतवणूक झाली.
 • प्रत्येक उपक्रम साधारण ८ वर्षात संपला.
 • कायमच्या सामाईक भांडवल पद्धतीची सुरवात ३,६९,८९१ पौंड इतक्या भांडवलाने झाली.

नोकरवर्ग :

कंपनीच्या उपक्रमासाठी जे संचालक मंडळ नेमले जाई त्याला पगार मिळत नसे. कंपनीच्या जनरल कोर्ट (म्हणजे सभेत) जी रक्कम मंजूर होईल ती रक्कम त्यांना सानुग्रह अनुदान (gratuity) म्हणून मिळत असे.
संचालक मंडळ एकूण २७ व्यक्तींचे असे आणि त्यांची निवड दरवर्षी जुलै महिन्यात निवडणूक घेऊन होत असे. या मंडळात १ गव्हर्नर, १ डेप्युटी गव्हर्नर, १ खजिनदार आणि २४ संचालक असत.

संदर्भसूची :

गजानन भास्कर मेहंदळे लिखित श्री राजा शिवछत्रपती मधून मूळ माहिती संकलन
वरील पुस्तकात वापरलेले संदर्भ पुढीलप्रमाणे:

शब्दांकन : श्रीकांत लव्हटे
shrikant.lavhate@gadkot.in
www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Shrikant Lavhate

Author is an amateur trekker, photographer and poet. He started his trekking back in 2009 and since then exploring the history of Marathas in ruins of Forts and all available chronicles.

One thought to “East India Company : History”

 1. खुप छान माहिती सर, पण फारच थोडक्यात वाटली. या विषयावर आणखी वाचायला आवडले असते.

आपला अभिप्राय नक्की कळवा | Leave a reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.